नागरी वस्तीत शिरकाव : तीन बकऱ्या व एक बोकड ठार; नुकसानग्रस्ताला मदतीचे नगराध्यक्षांचे आश्वासन
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी
नशिराबाद येथील हेडकर मोहल्ला परिसरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या गजबजलेल्या भागात मध्यरात्री लांडग्याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास झालेल्या या लांडग्याच्या हिंस्त्र हल्ल्यात तीन बकऱ्या आणि एक बोकड जागीच ठार झाले. नागरी वस्तीत थेट जनावरांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून लांडग्याने हा हल्ला केल्याने संपूर्ण नशिराबाद परिसरात कमालीची भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मध्यरात्री ३ वाजता घातला दरोडा
हेडकर मोहल्ल्यातील रहिवासी आणि बकरीपालक शेख इरफान शेख नूर यांच्या घराशेजारी जनावरांसाठी पत्र्याचे शेड आहे. नेहमीप्रमाणे रात्री जनावरे शेडमध्ये बांधलेली होती. दरम्यान, रविवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास एका हिंस्त्र लांडग्याने या गजबजलेल्या भागात शिरकाव केला. लांडग्याने थेट पत्र्याच्या शेडवर हल्ला चढवत आत प्रवेश केला आणि शेडमधील तीन बकऱ्या व एका बोकडाला पळवून लावत ठार केले. पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
वन विभागाकडून पंचनामा; सतर्कतेचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने सूत्रे हलवली. वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक हरीश थोरात (उमाळा) आणि वनरक्षक स्वप्निल गोसावी (मेहरुण) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव कायद्यानुसार पंचांच्या उपस्थितीत मृत जनावरांचा आणि जागेचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. “रात्रीच्या वेळी जनावरे पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि परिसरात कोणत्याही वन्य प्राण्याची हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन वनपाल उमाकांत कोळी यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधींकडून धाव; मदतीचे आश्वासन
घटनेचे गांभीर्य ओळखून नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच उपनगराध्यक्ष पंकज महाजन हे शासकीय कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी तातडीने मोबाईलवरून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. नगराध्यक्षांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त बकरीपालक शेख इरफान यांना शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नागरी वस्तीत लांडग्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, केवळ रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी आणि काही संशयास्पद आढळल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
