रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन संशयित आरोपींना अवघ्या काही दिवसांत बेड्या, हत्येचे धक्कादायक कारण समोर
साईमत -रावेर- प्रतिनिधी |
रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या मजुराच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंध आणि जुन्या वादाच्या सूडाची ही परिणिती असून, एका मजुराचा त्याच्याच मित्राने अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांनी दोन मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या आहेत.
ऐनपूरमधील ‘त्या’ घटनेचा घेतला बदला!
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी हे दोघे ऐनपूर येथे गावकऱ्यांच्या हाती रंगेहात सापडले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी आरोपी गणेशला चांगलाच चोप दिला होता. या सार्वजनिक अपमानामुळे गणेशच्या मनात मयताबद्दल कमालीचा राग होता. त्यातूनच त्याने मयताला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
दारू पाजली अन् गळा आवळला
९ जुलैच्या रात्री आरोपी गणेश घोरपडे याने आपला साथीदार मेघराज सांगळे याच्या मदतीने हत्येचा कट रचला. मयताला विश्वासात घेऊन त्यांनी आधी त्याला भरपूर दारू पाजली. तो पूर्णपणे नशेत झिंगल्यानंतर, त्याला मोटारसायकलवर बसवून नांदूरखेडा शिवारातील एका निर्जन शेतात नेण्यात आले. तिथे दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून गेम वाजवला आणि मृतदेह शेतात फेकून पसार झाले. दोन दिवसांनंतर हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
घटनास्थळी कसलीही सुगावा नसताना रावेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याचा वापर केला. संशयाची सुई गणेशकडे फिरताच पोलिसांनी त्याला आणि त्याचा साथीदार मेघराज सांगळे याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. पोपटासारखे बोलत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी गणेश घोरपडे आणि मेघराज सांगळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून, या घटनेमुळे रावेर तालुक्यात अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
