दूध फेडरेशन रोडवर इलेक्ट्रिकल्स दुकानाला अचानक आग साहित्य जळून खाक अग्निशमन दलाच्या धावपळीने टळला अनर्थ
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सोपाननगर, दूध फेडरेशन रोडवरील दिनेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकल साहित्य असल्याने आग वाढण्याची शक्यता होती; मात्र अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील साहित्य जळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माहिती मिळताच अग्निशमन दलाची तत्काळ धाव
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ८.५० वाजता प्राची तायडे यांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दुकानाला आग लागल्याची माहिती दूरध्वनीद्वारे दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशमन मुख्यालयातून तातडीने बंब रवाना करण्यात आला. काही वेळातच जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा मारा सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.
इलेक्ट्रिकल साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी
या आगीत दुकानातील पंखे, कुलर, इलेक्ट्रिक मोटारी तसेच इतर विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत तपास सुरू आहे.
वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला
दिनेश इलेक्ट्रिकल्स हे दुकान दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर नागरिक वास्तव्यास आहेत. दुकानातील इलेक्ट्रिकल साहित्यामुळे आग वेगाने पसरण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने पोहोचल्याने आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे रहिवाशांना कोणताही धोका निर्माण झाला नाही.
अग्निशमन जवानांच्या तत्परतेचे कौतुक
दुकानाचे मालक दिनेश भगवान परदेशी असून, आग विझविण्याच्या मोहिमेत अग्निशमन विभागाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण तसेच फायरमन संजय तायडे, नितीन ससाने आणि किरण पाटील यांनी तत्परतेने कामगिरी बजावली. जवानांच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच आग पूर्णपणे विझवण्यात आली. परिसरातील नागरिकांनीही अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले.
