साईमत न्यूज नेटवर्क –
जर तुम्ही नियमितपणे रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक प्रवासी RailOne App वरून बुक केलेल्या अनारक्षित तिकिटाचा स्क्रीनशॉट काढून किंवा WhatsApp वर आलेली प्रत दाखवून प्रवास करतात. मात्र, भारतीय रेल्वेने अशा तिकिटांसंदर्भात महत्त्वाचा नियम स्पष्ट केला आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार, RailOne App वरून बुक केलेले अनारक्षित (Unreserved) तिकीट केवळ ज्या नोंदणीकृत मोबाईल आणि मोबाईल क्रमांकावरून ते बुक करण्यात आले आहे, त्याच डिव्हाइसवर वैध मानले जाईल.
याचा अर्थ, तिकीट WhatsApp द्वारे दुसऱ्या मोबाईलवर पाठवणे, त्याचा स्क्रीनशॉट दाखवणे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शेअर केलेली प्रत सादर करणे वैध मानले जाणार नाही.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, डिजिटल तिकिटाची पडताळणी फक्त मूळ नोंदणीकृत मोबाईलवरच केली जाईल. त्यामुळे प्रवासादरम्यान तिकीट बुक केलेला तोच मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.
याशिवाय, प्रत्येक प्रवाशाकडे वैध फोटो ओळखपत्र असणेही बंधनकारक आहे. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा शासनमान्य इतर कोणतेही फोटो ओळखपत्र प्रवासावेळी सोबत ठेवावे लागेल.
तिकीट तपासणीदरम्यान टीटीई (TTE) प्रवाशाकडील नोंदणीकृत मोबाईलवरील तिकीट आणि फोटो ओळखपत्र या दोन्हींची पडताळणी करू शकतात. नियमांचे पालन न केल्यास प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे अनारक्षित तिकीट वापरताना रेल्वेच्या या नव्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
