पहाटेच्या सापळ्यात एमडी तस्कर दोघे अटकेत, ५६.२९ ग्रॅम ड्रग्ज जप्त
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून ५६.२९ ग्रॅम एमडीसह तीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तरुणांना व्यसनाच्या आहारी नेणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून अमली पदार्थ तस्करांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना शहरातील काही भागात एमडी विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालय परिसरातील जी.एस. ग्राऊंड येथे सापळा रचला.
पहाटेच्या वेळी संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची चाहूल लागताच त्यांच्यासोबत असलेला एक जण घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, पोलिसांनी दोन जणांना पकडण्यात यश मिळविले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ५६.२९ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ हस्तगत केला.
जप्त केलेल्या एमडीची किंमत २ लाख ८१ हजार ५४० रुपये असून, त्यासोबत २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
चौकशीत आरोपींनी हा अमली पदार्थ भैय्या सोनवणे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता एमडी पुरवठ्याच्या मूळ साखळीपर्यंत पोहोचण्यासाठी तपासाची दिशा निश्चित केली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासह या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.
अटक आरोपी जयेश तायडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, गंभीर दुखापत तसेच दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई यशस्वी केली.
