नागरिकांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ चिखलात अडकली कार आणि उघड झाला दरोड्याचा कट
साईमत /रावेर /प्रतिनिधी
रावेर शहरातून गुरुवारी सायंकाळी भरधाव वेगाने धावणाऱ्या संशयित कारमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दरोडा किंवा लुटमारीच्या तयारीत असलेल्या तिघांना रावेर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, पिंचीस, दोरी, बनावट नोटांचे बंडल तसेच कार असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाल येथून आभोडा मार्गे एक मारुती सुझुकी कार क्रमांक एमएच-१९-२४०३ ही रावेर शहरातून अत्यंत वेगाने जात होती. कारचा वेग इतका होता की रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. संशयास्पद हालचाली लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही कार आठवडे बाजार परिसरातील जुन्या नाल्याजवळून महामार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना चिखलात अडकली. त्यामुळे कारमधील संशयितांचा पुढील डाव फसला. नागरिकांनी तत्काळ धाव घेत कारमधील व्यक्तींना पकडून रावेर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी चौकशी केली असता कारमधील संशयितांची ओळख निखिल प्रवीण पाटील (वय २०), अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. घोडबंदर, जिल्हा ठाणे) आणि मेहेरबान जहागीर तडवी (रा. पाल) अशी पटली. या तिघांविरुद्ध दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारच्या झडतीत धक्कादायक साहित्य उघड
पोलिसांनी संशयित कारची तपासणी केली असता त्यामध्ये दरोड्यासाठी वापरता येणारी तलवार, लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, पिंचीस, सुती दोरी आदी साहित्य आढळून आले. याशिवाय लहान मुलांच्या खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट नोटांचे बंडलही कारमध्ये मिळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य ताब्यात घेतले आहे.
कारची किंमत सुमारे तीन लाख रुपये असून, ती देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या हालचालींचा तपास करताना त्यांचा नेमका उद्देश काय होता, ते कोणत्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते तसेच त्यांचा यापूर्वीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत. फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू असून, या कारवाईमुळे रावेर शहरातील संभाव्य गुन्हेगारी घटना टळल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
