साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली होती. बंद घरे हेरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या या टोळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही टोळी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होती. या घटनांची गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार केली. गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर सतत पाळत ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल गु.रजि.क्र. ६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(४) प्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू असताना, गुन्हे शोध पथकाला (DB Team) गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणातून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि खालील ५ अट्टल आरोपींना ताब्यात घेतले:
१) गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६, रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव – टोळीचा मुख्य म्होरक्या)
२) दीपक बापू पाटील (वय २३, रा. पंचशील नगर, तांबापुरा, जळगाव)
३) राजेश माणिक राठोड (वय २४, रा. तांबापुरा, जळगाव)
४) सुमित संजय कोळी (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव)
५) महेश उर्फ संतोष भोई (वय २४, रा. तांबापुरा, जळगाव)
१० गुन्ह्यांची दिली कबुली
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी सखोल आणि कसून चौकशी केली असता, त्यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली. यामध्ये ०९ घरफोडी (House Breaking Theft) आणि ०१ मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
उघडकीस आलेल्या गुन्ह्यांतून पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:
२,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल (घरफोडीच्या गुन्ह्यांमधील)
२,००,०००/- रुपये किमतीच्या एकूण ०४ मोटरसायकली
एकूण ४,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मुख्य आरोपीवर आधीच १३ गंभीर गुन्हे, MPDA अंतर्गत झाली होती कारवाई:
या टोळीचा मुख्य सूत्रधार गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच एमआयडीसी (MIDC) पोलीस स्टेशनमध्ये ११ गुन्हे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये ०१ गुन्हा आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये ०१ गुन्हा असे तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान असेही समोर आले की, या आरोपीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केले होते. मात्र, तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत संपूर्ण टोळीला जेरबंद करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणापुरे (जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली; जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोफेशनल पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले, पोहेकॉ/प्रदीप राजपूत तसेच गुन्हे शोध पथकाचे (DB Team) पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दिपक देवरे आणि वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील व पंकज देशमुख या पथकाने केली आहे.
- जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव.
