मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याने घेतला शिरसोलीच्या भावेशचा बळी
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या भीषण कचरा डेपो दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोशी परिसरातील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत भावेश मोहन वाणी (वय ३३) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरसोली गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील मोशी येथे कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेला कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने दुर्घटना घडली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भावेश वाणी यांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
भावेश वाणी हे मूळचे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते पुणे येथे वास्तव्यास होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या भावेश यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.
शिरसोली येथे भावेश यांच्या निधनाची वार्ता पोहोचताच गावातील वातावरण भावूक झाले. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, भावेश मोहन वाणी यांच्यावर गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजता पुण्यातील रुपी नगर स्मशानभूमी, निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. पुण्यातील या दुर्घटनेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
