साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू), जळगावतर्फे येथील खूबचंद सागरमल विद्यालय येथे बांधकाम व घरेलू कामगारांच्या विद्यार्थी पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
मोबाईलचा मर्यादित व विधायक वापर करा : अमोल कोल्हे
व्यासपीठावरील प्रमुख अतिथी व मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
”विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त व प्रामाणिकपणाच्या बळावर शिक्षणात यश मिळवावे. शिक्षकांच्या आदेशांचे व सूचनांचे पालन करावे तसेच मोबाईलचा मर्यादित व विधायक वापर करून ज्ञानवृद्धीवर भर द्यावा. वाटप करण्यात आलेल्या वह्यांचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे.”
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
यावेळी सिटूचे कामगार नेते कॉ. विजय पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्या स्थापनेसाठी सिटूच्या लाल झेंड्याखाली दोन्ही संघटनांनी मोठा संघर्ष केला आहे. बांधकाम व घरेलू कामगारांच्या मुलांनी पहिली ते दहावी तसेच उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व विविध सामाजिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जळगाव येथील घरेलू व बांधकाम कामगार संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर कॉ. विजय पवार यांच्यासह कॉ. रावसाहेब धोबी, कॉ. विजय कोळी, घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी कॉ. आशाबाई महाजन, कॉ. निर्मला भावसार, कॉ. संगीता भावसार तसेच खूबचंद सागरमल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिनी बेंडाळे उपस्थित होत्या.
या शैक्षणिक सहाय्यता कार्यक्रमासाठी वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटना (MSMRA) आणि लाकूडपेठ, शिवाजीनगर येथील प्रमुख व्यावसायिक शैलेशभाई पटेल व शंकरभाई पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. लक्ष्मीकांत महाजन यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षिका सौ. कल्पना देवरे, सौ. करुणा महाले, सौ. सुनिता येवले, श्री. संतोष चौधरी, श्री. अजय पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिटू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
