जीपीएस मित्रपरिवार, झुंझुनवाला हॉस्पिटल आणि शिवसेना यांचा स्तुत्य उपक्रम; १३४ नागरिकांची झाली तपासणी
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी
येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जीपीएस मित्रपरिवार, आर. आर. झुंझुनवाला हॉस्पिटल आणि नशिराबाद शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात नशिराबाद व परिसरातील एकूण १३४ नागरिकांची अत्याधुनिक उपकरणांद्वारे नेत्रतपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान ५४ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी तातडीने लक्झरी बसद्वारे पनवेल येथील आर. आर. झुंझुनवाला हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. या रुग्णांवर पुढील दोन दिवसांत पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून, त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
शस्त्रक्रिया आणि सर्व सुविधा मोफत
पनवेल येथील नामांकित आर. आर. झुंझुनवाला हॉस्पिटलमध्ये या ५४ रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल. यासाठी रुग्णांकडून एकही रुपया घेतला जाणार नसून, शस्त्रक्रियेनंतर लागणारी औषधे आणि चष्मे देखील मोफत दिले जाणार आहेत. या उपक्रमामुळे अनेक वृद्ध आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य
या संपूर्ण आरोग्य उपक्रमासाठी राज्याचे मंत्री तथा लाडके लोकप्रतिनिधी नामदार गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगत आयोजकांनी त्यांचे विशेष आभार मानले.
”महागाईच्या काळात डोळ्यांचे ऑपरेशन करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशा वेळी गावातच तपासणी करून थेट पनवेलला नेऊन मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.”
– समाधान व्यक्त करणारे नशिराबादचे ग्रामस्थ.
