साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
जामनेर शहरात आणि परिसरात वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, जामनेर पोलिसांनी कौशल्याने तपास करत चोरी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि बाईक असा ६ लाख २४ हजारांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी एका घरातून ७० हजार रुपयांची रोकड लंपास झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरिफखान लालखान कंजर आणि मुबारिक अली खान या दोघांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीची ७० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली विना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.
दुसऱ्या घटनेत मदनीनगर भागात एका बंद घराला टार्गेट करत चोरट्यांनी तब्बल ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता. या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहम्मद फातीर उर्फ गोलू मिया तेफुल मोहम्मद आणि शेख अमीर शेख जाकीर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मदनीनगर घरफोडी प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने, ७१ हजार ५०० रुपयांची रोकड आणि तीन मोबाईल असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
