लिथियम-आयन बॅटरी चार्जिंगदरम्यान आग फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण २० मिनिटांत आटोक्यात
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहरातील शिव कॉलनी परिसरात शुक्रवारी दुपारी सुमारे २.५९ वाजता मोठी आग लागल्याची घटना घडली. गुरुकृपा क्लासेसजवळ असलेल्या गुंजन अपार्टमेंटच्या तळमजल्यावर कार्यरत असलेल्या ‘परिवर्तन इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटर’ या दुकानाला अचानक आग लागली. इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटरीचे चार्जिंग सुरू असतानाच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होऊ शकणारी हानी टळली.
या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक बाईकच्या लिथियम-आयन बॅटऱ्या तसेच सर्व्हिसिंगसाठी वापरले जाणारे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुकानाचे मालक निखिल संजय जाधव असून इमारतीच्या मालक सौ. संगीता राजेंद्र पाटील आहेत.
लिथियम-आयन बॅटरीमुळे आग अधिक तीव्र आणि धोकादायक स्वरूपाची बनल्याने अग्निशमन दलाने सुरुवातीला पाण्याचा मारा केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष फोमचा प्रभावी वापर करण्यात आला. तीन अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. त्यापैकी दोन वाहनांच्या मदतीने आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान, आग तळमजल्यावर लागल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांच्या घरांतील एलपीजी सिलेंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. ही वेळेवर घेतलेली खबरदारी ठरली निर्णायक ठरली असून संभाव्य स्फोट किंवा जीवितहानी टळली, असे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.
या संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि उपअग्निशमन अधिकारी भारत बारी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वेगाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या मोहिमेत वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रभाकर पाटील, गोविंद सोनवणे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, रजनीश भावसार, सत्तार तडवी, सुमित साबळे, यश मनोरे, नवल शंकरपाळ, ललित पाटील, दीपक रांधडे, रितेश उबाळे, वृषभ सुरवाडे आणि रवींद्र सपकाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आग आटोक्यात आणली.
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “लिथियम-आयन बॅटरीमुळे आग अत्यंत वेगाने पसरत होती. योग्य वेळी फोमचा वापर करून केवळ २० मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली.”
