भुयारी गटारीच्या कामाचा फटका चिखलात बोलेरो फसली पारोळ्यात संतापाची लाट
साईमत /पारोळा /प्रतिनिधी
सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील महामार्गालगत कजगाव चौफुली परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने एका बोलेरो वाहनाचा चिखलात अडकण्याचा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहन सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.
महामार्गालगत सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, या खड्ड्यांमध्ये योग्य पद्धतीने भराव न केल्याने आणि त्यावर पुरेशी दुरुस्ती न झाल्याने पावसाच्या पाण्यामुळे माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली. परिणामी ठिकठिकाणी खोल आणि धोकादायक खड्डे निर्माण झाले असून रस्त्याचा संपूर्ण भागच धोकादायक बनला आहे.
या परिस्थितीमुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वेळा दुचाकी व चारचाकी वाहने खड्ड्यात अडकण्याच्या घटना घडत असून नागरिकांना चिखलातून चालणेही कठीण झाले आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत हातगाडीच्या साहाय्याने वाहतुकीचे तात्पुरते नियोजन केले.
घटनेच्या वेळी मनोज कासार, आबा महाजन, भूषण कासार, शांताराम महाजन, बंटी बारी, दीपक देवरे तसेच पत्रकार प्रकाश पाटील उपस्थित होते. त्यांनी तत्काळ मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि बोलेरो वाहन बाहेर काढण्यात यश मिळवले.
दरम्यान, रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
