साईमत विशेष प्रतिनिधी । छगनसिंग पाटील
जळगाव जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलडे यांच्या कार्यालयातून ‘पंटर’मार्फत खुलेआम वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौकशीच्या तक्रारी दाबून ठेवणे, तक्रारदाराला गोड बोलून परत पाठवणे आणि खालच्या स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांना ,“तुम्हीही पैसे कमवा, बाकी मी बघतो” असा संकेत देणारा अजब फंडा राबवला जात असल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा बदनामीच्या खाईत लोटली जात आहे.
तक्रार दाबण्याचा ‘आकलडे पॅटर्न’
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या ग्रामपंचायतींचे आर्थिक गैरव्यवहार, बोगस कामे, निधी अपहारासंबंधीच्या तक्रारी भाऊसाहेब आकलडे यांच्याकडे येतात. मात्र, या तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी संबंधित सरपंच-ग्रामसेवकांकडून ‘अर्थपूर्ण’ तडजोड केली जाते. तक्रारदाराला कार्यालयात बोलावून “मिटवून घ्या, उगाच वाद नको” असे सांगून गोड बोलून परत पाठवले जाते. नंतर संबंधित गटविकास अधिकाऱ्याला फोन करून “मॅनेज करा, तुम्हीही कमवा आणि वरिष्ठांना वाटा द्या, बाकी मी बघतो” अशी दमबाजी केली जाते.या ‘सेटलमेंट’साठी आकलडे यांचे काही विश्वासू ग्रामविकास अधिकारी व खासगी ‘पंटर’ थेट सरपंच व ग्रामसेवकांकडे जाऊन वसुली करतात. “साहेबांचे नाव घेऊन खुलेआम पैसे मागितले जातात. नाही दिले तर चौकशी लावण्याची धमकी दिली जाते,” असे एका ग्रामसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मंत्री महाजनांचा ओएसडी होतो, कोणाला घाबरत नाही
या प्रकाराबाबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. भाऊसाहेब आकलडे हे मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम करून चुकले आहेत. त्यामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत. ‘माझं कोणी वाकडं करू शकत नाही’ अशी भाषा ते उघडपणे वापरतात. पैसे कामविण्यात ते शातीर आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तत्कालिन सीईओ मीनल करनवाल यांनी केली होती कारवाई
भाऊसाहेब आकलडे यांचे हे उद्योग नवे नाहीत. यापूर्वी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मीनल करनवाल यांनी आकलडे यांच्या याच भ्रष्ट कारभाराची गंभीर दखल घेतली होती. तक्रारी दाबणे, वसुली करणे व कामात हलगर्जीपणा केल्याने करनवाल यांनी आकलडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते व पदमुक्त केले होते. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे काही महिन्यांतच त्यांची पुन्हा त्याच पदावर वर्णी लागली.
नवीन सीईओ काय करणार?
जळगाव जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मीनल करनवाल यांच्याप्रमाणे त्याही आकलडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार का? याची उत्सुकता आहे.
जिल्हा परिषदेची प्रतिमा डागाळली
ग्रामपंचायत विभाग ग्रामीण विकासाचा कणा आहे. १५ वा वित्त आयोग, पेसा, घरकुल योजनांसारख्या कोट्यवधींच्या योजना याच विभागामार्फत राबवल्या जातात. मात्र, विभागप्रमुखच वसुलीचे रॅकेट चालवत असेल, तर गावपातळीवरील भ्रष्टाचाराला आळा कोण घालणार? आकलडे साहेबांमुळे संपूर्ण जिल्हा परिषद बदनाम होत आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कृत्यामुळे संशयाच्या नजरेने पाहिले जाते, अशी खंत एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने व्यक्त केली.
