साईमत न्यूज नेटवर्क –
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गुरुवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. बंगळुरू दक्षिण तालुक्यातील मदापटना परिसरातील एका दगड खाणीत अचानक मोठी दरड कोसळल्याने नऊ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मृत्यू झालेले सर्व मजूर बिहारमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत दगड फोडण्याचे आणि उत्खननाचे काम सुरू असताना पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका कामगाराने सांगितले की, सुमारे १८ मजूर काम करत असताना जवळपास ४० फूट उंचीवरून मोठी दरड त्यांच्या अंगावर कोसळली. मृत्यू झालेले सर्वजण स्टोन क्रशर साइटवर रोजंदारीवर काम करणारे मजूर होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अनेक जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून ढिगारा हटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व नऊ मजूर बिहारमधील असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरड नेमकी कशामुळे कोसळली, तसेच खाणीत सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची सखोल चौकशी केली जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
