दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार अटकेत गावठी पिस्तूल जप्त ५८ गंभीर गुन्ह्यांचा सराईत गुन्हेगार अखेर जाळ्यात
साईमत /जळगाव /प्रतिनिधी |
शहरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या निर्णायक कारवाईत विजय वसंत अहिरे उर्फ ‘भोमपाली’ (वय ३२) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा अवैध शस्त्र व गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
गेंदालाल मिल परिसरात आरोपी हा गावठी पिस्तूल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २ जुलै रोजी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून विजय अहिरे हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल तसेच शस्त्र कायदा अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण ५८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईनंतर शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जप्त करण्यात आलेल्या गावठी पिस्तुलाबाबत पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव तसेच पोलिस कॉन्स्टेबल छगन तायडे, रवींद्र कापडे, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे यांचा सहभाग होता.
