पुणे/मुंबई:
राज्यात अनेकदा मुदतवाढ देऊनही ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) न बसवणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने (RTO) अखेर बुधवारपासून ‘ॲक्शन मोड’वर येत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तपासणी केलेल्या १५८ वाहनांपैकी ५४ वाहने दोषी आढळली. मात्र, राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ८० टक्के पथकांना आपला डिजिटल अहवाल अपलोड करता आला नाही. परिणामी, पहिल्या दिवशी कारवाईचा अचूक आकडा समोर येऊ शकला नसला तरी आगामी काळात ही मोहीम तीव्र होणार असल्याचे संकेत आरटीओने दिले आहेत.
पावसाचा ‘ब्रेक’, ८०% अहवाल प्रलंबित
बुधवारपासून राज्यव्यापी मोहीम सुरू झाली असली, तरी वरुणराजाने आरटीओच्या कारवाईचा वेग मंदावला. राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंमलबजावणी पथकांना रस्त्यावर तपासणी करताना अडचणी आल्या. तसेच, तांत्रिक कारणांमुळे जिल्हानिहाय दैनंदिन अहवाल वेळेत अपलोड होऊ शकला नाही. केवळ ५ ते ७ आरटीओ कार्यालयांनीच पहिल्या दिवसाची आकडेवारी सादर केली आहे. हवामान सुधारताच प्रलंबित अहवाल प्राप्त होतील आणि कारवाईचे खरे ‘महाचित्र’ समोर येईल, अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली.
एकूण तपासलेली वाहने: १५८
दोषी आढळलेली वाहने: ५४
वसूल केलेला दंड: ₹० (पहिल्या दिवशी केवळ नोंद झाली, दंडाची रक्कम अद्याप संकलित व्हायची आहे)
‘HSRP’ का महत्त्वाचे?
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट केवळ सरकारी नियम नसून वाहनाच्या सुरक्षेसाठी ‘कवच’ आहे.
१. छेडछाड रोखणे: या नंबर प्लेटसोबत छेडछाड करणे किंवा ती बदलणे गुन्हेगारांना अशक्य होते.
२. चोरीला आळा: कायदे अंमलबजावणी यंत्रणांना आणि पोलिसांना चोरीच्या वाहनांचा मागोवा घेणे अत्यंत सोपे होते.
…तर खिसा रिकामा होणार!
शासनाने यापूर्वी ‘HSRP’ बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. तरीही लाखो वाहनधारकांनी याकडे डोळेझाक केली. आता मात्र सवलतीचे दिवस संपले आहेत. आरटीओने थेट रस्त्यावर उतरून तपासणी सुरू केल्यामुळे, जर तुमच्या वाहनाला अजूनही हाय सिक्युरिटी प्लेट नसेल, तर आजच अधिकृत पोर्टलवरून ती बुक करा; अन्यथा आरटीओच्या दंडाचा मोठा फटका बसू शकतो.
