हजारो वारकऱ्यांचा सुरक्षित परतीचा प्रवास पंढरीची वारी पूर्ण करून वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत
साईमत /पाळधी (ता. धरणगाव), / प्रतिनिधी
पंढरपूरच्या पावन वारीत सहभागी होऊन विठुरायाच्या चरणी सेवा अर्पण करून सुखरूप परतलेल्या वारकऱ्यांचे पाळधी रेल्वे स्थानक परिसरात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वारीच्या प्रवासाची सांगता आनंदमय वातावरणात झाली.
ग्रा.प. सदस्य तथा उद्योजक अनिल कासट यांनी रेल्वे स्थानक परिसरात वारी परतल्यानंतर स्वागताचे सूक्ष्म व शिस्तबद्ध नियोजन केले. या संपूर्ण आयोजनात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. वारीच्या यशस्वी नियोजनामुळे हजारो वारकरी रेल्वे व एस.टी.च्या माध्यमातून सुरक्षितपणे पंढरपूरला जाऊन परतू शकले.
वारी पूर्ण करून परतलेल्या वारकऱ्यांचा रेल्वे स्थानकावर पोहोचताच पुष्पवृष्टी करून आणि जयघोषात स्वागत करण्यात आले. यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते. “विठू नामाचा गजर” आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला.
गेल्या तीन वर्षांपासून जीपीएस मित्र परिवार व विकी बाबा युवा मंच यांच्या पुढाकाराने रेल्वे व एस.टी.च्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग या वारीत होत आहे. यंदाही मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी शिस्तबद्धपणे सहभाग नोंदवला.
या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील भावूक झाले. “वारीदरम्यान सर्व वारकऱ्यांनी अतिशय शिस्त पाळत दोन दिवस अखंड विठ्ठल नामस्मरण करत पांडुरंगाचे आशीर्वाद घेतले, हेच खरे समाधान आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व वारकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या भव्य स्वागत सोहळ्याला जीपीएस मित्र परिवाराचे धनराज कासट, मुकेश भोई, प्रशांत झवर, चंदू पाटील, दिलीप माळी, भूषण महाजन, अनिल महाजन, आबा माळी, कल्पेश कोळी यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “पुन्हा भेटू पंढरीच्या वाटेवर” असा संकल्प व्यक्त करत भक्तिमय वातावरणात सोहळ्याची सांगता केली.
