साईमत- फैजपूर – प्रतिनिधी|
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या असहायतेचा फायदा घेत, तिच्याच शेजाऱ्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. आरोपीने वृद्ध महिला घरात एकटी असल्याचे पाहून पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला. महिला पाणी आणण्यासाठी गेली असता, आरोपीने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. या अनपेक्षित प्रसंगामुळे वृद्ध महिला प्रचंड घाबरली होती.
घटनेचा धक्का ओसरल्यानंतर पीडित वृद्धेने अत्यंत धैर्याने फैजपूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्रीतूनच चक्र फिरवली आणि आरोपीला अटक केली.
या घटनेमुळे फैजपूर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. “नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे,” असे आवाहन फैजपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
