साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई चेंबूर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शाळेच्या बसवर महाकाय झाड कोसळल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर १० विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिवळ्या रंगाची शाळेची बस चेंबूरमधील एका रस्त्यावर विद्यार्थ्यांना घेऊन उभी होती. बसमध्ये एकूण १३ विद्यार्थी होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेले एक जुने आणि मोठे झाड अचानक उन्मळून थेट बसवर कोसळले. अचानक घडलेल्या या अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले आणि विद्यार्थी बसमध्येच अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. झाडाचा आकार मोठा असल्याने ते थेट हटविणे शक्य नव्हते. त्यामुळे झाडाच्या फांद्या कापून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या अपघातानंतर झाडांच्या देखभालीच्या प्रश्नावरून पालिका प्रशासनावर टीका होत आहे. मुंबईच्या माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या घटनेसाठी संबंधित उद्यान विभागाला जबाबदार धरत संबंधित उद्यान अधीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी, संरचनात्मक तपासणी आणि धोकादायक झाडांची पाहणी नियमितपणे केली असती, तर अशी दुर्घटना टाळता आली असती, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली असून, झाड कोसळण्यामागील नेमके कारण, त्याची पूर्वस्थिती आणि देखभालीत काही हलगर्जीपणा झाला होता का, याचा तपास केला जात आहे. तसेच शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
