गोठ्यात काम करताना घडली घटना, कुटुंबावर शोककळा
साईमत /पारोळा / प्रतिनिधी
तालुक्यातील देवगाव येथे रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत सर्पदंशामुळे एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भास्कर नारायण पाटील (वय ७५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी घरामागील शेतातील गोठ्यात जनावरांचे दूध काढण्यासाठी तसेच चारापाणी करण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. त्या वेळी ते गोठ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले.
त्यांच्या उजव्या पायाच्या टाचेवर विषारी सापाने दंश केल्याच्या स्पष्ट खुणा दिसून आल्या. तसेच त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही निदर्शनास आले. तातडीने त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी सचिन देविदास पाटील यांच्या माहितीनुसार पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, भास्कर पाटील हे कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या निधनाने आर्थिकदृष्ट्याही कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. आधीच हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली असून, सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
