मुंबई-गोवा महामार्गावर कार-पिकअपची समोरासमोर धडक; चालक जखमी
साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीजवळ आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कणकवलीहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार आणि समोरून येणारी पिकअप यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. धडकेचा परिणाम इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कारचालक जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
समृद्धी महामार्गावर ट्रक-कार धडक; एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर टोलनाक्याजवळ आणखी एक भीषण अपघात घडला. चंद्रपूर जिल्ह्यातील एक कुटुंब कारने मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना चॅनल क्रमांक १०५ जवळ पुढे चालणाऱ्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे रस्ते अपघातांच्या या सलग घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
