भरधाव ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटला ट्रॅव्हल्स उलटली, २२ प्रवासी बचावले
साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गायरान फाट्याजवळ रविवारी सकाळी एका खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. पाचोऱ्याकडून गुजरातच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सर्व २२ प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठी दुर्घटना टळली.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याबाहेर जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की, वाहनात बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि तरुणांनी कोणतीही पर्वा न करता तातडीने मदतकार्य सुरू केले. ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून तसेच दरवाजे उघडून त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे बचावकार्य वेगाने पार पडले आणि संभाव्य जीवितहानी टळली.
अपघातात जखमी झालेल्या सहा प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने त्वरित जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्घटनेत ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असले, तरी स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे २२ प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
