टाळ-मृदंगाच्या गजरात नामघोषात चांदसर दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना पालकमंत्र्यांनी साधला वारकऱ्यांशी संवाद
साईमत /पाळधी, ता. धरणगाव / प्रतिनिधी
श्रीक्षेत्र चांदसर येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अभंगांच्या गजरात पारंपरिक पालखी-दिंडीचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. “ज्ञानोबा-तुकोबा”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारी ही माझ्यासाठी केवळ परंपरा नसून आयुष्याचा श्वास आहे. गेल्या १७ वर्षांपासून मी या दिंडी प्रस्थान सोहळ्याला नियमित उपस्थित राहत असून, दरवर्षी विठ्ठलाच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होतो. वारीतून मला जनसेवेची नवी ऊर्जा, नवे बळ आणि समाजासाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. विठ्ठल माऊलीच्या कृपेनेच जनतेची सेवा करण्याचे सामर्थ्य लाभले आहे.”
त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींनाही उजाळा दिला. स्वर्गीय मुरलीधर अण्णा पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात “हा मुलगा एक दिवस आमदार होईल,” असे भाकीत केले होते. त्यानंतर १९९९ मध्ये आमदार होण्याची संधी मिळाली. त्या दिवसापासून आजपर्यंत चांदसर गावाने आणि पवार परिवाराने दिलेले प्रेम, विश्वास व आशीर्वाद हेच माझे खरे वैभव असल्याचे सांगत त्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गेल्या सुमारे ३५ वर्षांत एकही वारी जाणीवपूर्वक चुकवलेली नसल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले, “वारीत मिळणारे आत्मिक समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. विठ्ठलाच्या नामस्मरणातून मनाला शांतता लाभते, तर वारकऱ्यांच्या सहवासातून समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळते. समाजसेवा आणि विठ्ठलसेवा यापेक्षा मोठे भाग्य दुसरे नाही.”
कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सलग बारा वर्षे वारी केल्याचा अनुभव कथन केला. वारकरी संप्रदायातील शिस्त, समता, सेवाभाव आणि अध्यात्मिक आनंद यांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
प्रास्ताविकात चांदसर वारीचे संस्थापक सुनील पवार यांनी दिंडीच्या इतिहासाची माहिती देताना सांगितले की, चांदसर ते पंढरपूर हा सुमारे २४ दिवसांचा पायी प्रवास वारकरी पूर्ण करतात. पंढरपुरात सहा दिवस मुक्काम करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, नामस्मरण, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेत पारंपरिक वारीची सांगता होते.
कार्यक्रमाचा समारोप “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम…” या अखंड नामगजराने आणि विठ्ठलाच्या जयघोषात अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते डी. जे. भाऊसाहेब, सुभाष अण्णा पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, अमित पाटील, अरविंद देशमुख, नितीन सबके, अमर जैन, रोहित निकम, जितेंद्र देशमुख यांच्यासह वारकरी, भजनी मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
