पावसाची हजेरी, तापमानात घसरण; जळगावात गारव्याची चाहूल
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
जून महिन्याचा उत्तरार्ध उजाडूनही पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यातील नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाच्या या हजेरीनंतर तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे.
सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसानंतर गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. तरीही संपूर्ण दिवसभर आकाशात ढगांची गर्दी कायम होती. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा आणि गारठा जाणवत राहिला. या पावसामुळे जिल्ह्याचा पारा खाली येत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावला असून उष्णतेचा ताण काहीसा कमी झाला आहे.
हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आगामी चार दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, मात्र जोरदार पावसाची शक्यता सध्या वर्तविण्यात आलेली नाही. १ जुलैपर्यंत तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील पावसाची स्थिती
गेल्या काही दिवसांत हवामान विभागाने २९ तारखेपर्यंत पावसाचा ठोस अंदाज वर्तवला नव्हता. मात्र त्यानंतर जिल्ह्यात अचानक हवामान बदल होऊन ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पहाटे काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. सकाळपासून दिवसभर आकाश ढगाळ राहिले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पेरण्यांना वेग
दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी चिंतेत होते. रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या थांबल्या होत्या. मात्र गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पुन्हा शेताकडे मोर्चा वळवला असून पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात सध्या मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
उकाड्यापासून दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
उशिरा का होईना, पावसाच्या आगमनामुळे जळगावकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे बळीराजाच्या चेहऱ्यावरही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात समाधानाचे चित्र दिसत आहे. आगामी काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानानुसार नियोजन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
