जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे तीव्र ‘ठिय्या आंदोलन’
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने हक्काची नुकसान भरपाई मिळावी, केळी पीकविमा मंजूर व्हावा आणि कोणत्याही निकषांशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागण्यांसाठी आज जळगावात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. आज २५ जून २०२६ रोजी शेतकरी जन आक्रोश मोर्चा आणि शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास थेट पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आक्रमक इशारा शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे समन्वयक प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप
शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रा. भाऊसाहेब सोनवणे व शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकरी एकवटले होते. शेतात केळीचे पीक उभे असतानाही विमा कंपन्यांनी तांत्रिक कारणे पुढे करत अनेक पीकविमा प्रस्ताव नाकारले आहेत. तसेच, कोणतीही प्रत्यक्ष पाहणी किंवा पडताळणी न करता बहुतांश शेतकऱ्यांचे पीकविमा क्षेत्र परस्पर कमी-अधिक करण्यात आले आहे. विमा कंपन्यांच्या या मनमानी आणि अन्यायी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी देशोधडधडीला लागला असून, प्रशासनाने यात त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांच्या ६ प्रमुख मागण्या:
१) नाकारलेले पीकविमा प्रस्ताव त्वरित मंजूर करा: शेतात केळीचे पीक उभे असताना नाकारण्यात आलेल्या पीकविमा प्रस्तावांची प्रत्यक्ष पाहणी करून ते त्वरित मंजूर करावेत.
२) पीकविमा क्षेत्र पूर्ववत करा: कोणतीही पडताळणी न करता ज्या शेतकऱ्यांचे विमा क्षेत्र कमी करण्यात आले आहे, त्यांचे सुरुवातीला मंजूर असलेले क्षेत्र पूर्ववत करावे.
३) सरसकट कर्जमाफी: शेतकऱ्यांना कुठलेही जाचक निकष न लावता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
४) हेक्टरी २ लाख रुपये अनुदान: वादळ व वाऱ्यामुळे ज्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांना हेक्टरी २ लाख रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे.
) खरीप पीकविमा योजना: शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळण्यासाठी चालू वर्षी खरीप पीकविमा योजना पूर्वीप्रमाणेच पाच निकष लावून राबवावी.
६) परवानाधारक व्यापारी अनिवार्य: केळी उत्पादक शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारा व्यापारी हा केवळ परवानाधारकच असावा, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल.
“शेतकऱ्यांच्या या मागण्या अत्यंत रास्त आहेत. शासनाने आणि प्रशासनाने केळी उत्पादकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. जर या मागण्यांवर तत्काळ सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पुढील काळात पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.”
— प्रा. भाऊसाहेब सोनवणे (समन्वयक, शेतकरी जन आक्रोश मोर्चा) / संदीप पाटील (शेतकरी संघटना)
