बांधकामाधीन पाच मजली गोदाम अचानक कोसळले; २० जखमी, अनेक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
साईमत न्यूज नेटवर्क –
कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण गोदाम दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बांधकामाधीन पाच मजली गोदामाचे छत अचानक कोसळल्याने आत काम करणारे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेत सुमारे २० कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफ, अग्निशमन दल, लष्कर आणि कोलकाता पोलिसांची संयुक्त पथके घटनास्थळी कार्यरत आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये गोदामाचा मालक शंभू बेहरा, सुपरवायझर सय्यद मोहम्मद गुलजार, मजूर पुरवठादार मोहम्मद अताउल आणि सुभाष चौधरी यांचा समावेश आहे. ठेकेदार मोहम्मद असगर याच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून निष्काळजीपणा आणि बांधकामातील त्रुटींच्या दृष्टीने सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे गोदाम सुमारे दीड वर्षांपासून बांधकामाधीन होते आणि बुधवारी दुपारी १२:०७ वाजता अचानक कोसळले. त्या वेळी सुमारे ४० कामगार आत काम करत होते. ढिगाऱ्याखाली सुमारे १५ जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या संरचनेत कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत भिंती किंवा स्वतंत्र खोल्या नव्हत्या, अशी माहितीही समोर आली आहे.
घटनास्थळी मोठे काँक्रीटचे ढिगारे आणि लोखंडी बीम हटवण्यासाठी क्रेन तसेच हायड्रॉलिक यंत्रणा वापरली जात आहे. अडकलेल्या लोकांना पाणी आणि ऑक्सिजन पुरवण्यात येत असून बचावकार्य रात्रीही सुरू ठेवण्यासाठी तात्पुरते वैद्यकीय कॅम्प आणि अतिरिक्त रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांचे आवाज ऐकू येत असल्याने बचाव पथकांकडून अडकलेल्यांना वाचवण्याची आशा कायम आहे.
या दुर्घटनेतील मृतांमध्ये कृष्णा चौधरी, रोहित चौधरी आणि राहुल चौधरी यांची नावे समोर आली असून इतर दोन जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडूनही लवकरच अतिरिक्त मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
