साईमत न्यूज नेटवर्क –
जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम ते मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून काही भागांत रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून शहरासह ग्रामीण भागात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा मिळाला आहे. तसेच रखडलेल्या शेतीकामांना आणि पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई, रायगड आणि पालघर या भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण पट्ट्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पुणे, सातारा घाटमाथा आणि सिंधुदुर्ग भागातही मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनने पालघर ते वर्धा या पट्ट्यापर्यंत प्रगती केली असून महाराष्ट्राचा मोठा भाग त्याच्या प्रभावाखाली आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असून मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
