ऑनलाइन प्रणाली व तंत्रज्ञानाच्या वापरावर भर
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा व्यवस्थेची व्याप्ती वाढवून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासन आणि आयआयटी मद्रासअंतर्गत असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यशाळेला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक माहितीचे प्रभावी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समन्वय वाढविणे हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
प्रशिक्षण सत्रात डॉ. रोशन जोशी आणि मुख्य प्रकल्प अधिकारी प्रदीप कुमार यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षेसंदर्भातील माहिती ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदविण्याची प्रक्रिया, अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख, नियमित सर्वेक्षण तसेच आवश्यक उपाययोजना कशा राबवाव्यात याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
अपघातप्रवण भागांजवळ उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन साधनसामग्रीचे मूल्यमापन कसे करावे याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यासाठी विविध विभागांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षणास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, नायब तहसीलदार रवींद्र उगले यांच्यासह पोलीस, परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महानगरपालिका व नगरपालिका विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञान, माहिती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की,
“अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून मिळालेली माहिती प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणल्यास जिल्ह्यातील जीवितहानी कमी करण्यास मोठी मदत होईल.”
