स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचा पुढाकार; २० वर्षांचा विचार करून नूतनीकरणाचा ठोस प्रस्ताव
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहाचे संपूर्ण आधुनिकीकरण करून त्याला भविष्यातील गरजांनुसार सुसज्ज करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या सभागृहाचा आगामी २० वर्षांचा विचार करून अत्याधुनिक पद्धतीने कायापालट करण्याची मागणी केली आहे.
डॉ. पाटील यांनी २२ जून रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मनपाचे हे मुख्य सभागृह केवळ महासभा किंवा स्थायी समितीच्या बैठकांसाठीच नव्हे, तर विविध विभागीय आढावा बैठकांपासून ते लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण चर्चांसाठी नियमितपणे वापरले जाते. वाढत्या प्रशासकीय कामकाजाची व्याप्ती आणि भविष्यातील सदस्यसंख्या लक्षात घेता सध्याची सुविधा अपुरी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर सभागृहाला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण इंटेरियरचे नूतनीकरण, ध्वनिरोधक व्यवस्था, अत्याधुनिक प्रकाशयोजना, आकर्षक फॉल सिलिंग, डिजिटल डिस्प्ले प्रणाली आणि आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. तसेच एलईडी स्क्रीन, सेंट्रल कंट्रोल सिस्टम, सुधारित आसनव्यवस्था, दर्जेदार फर्निचर आणि पूर्ण वातानुकूलित यंत्रणा यामुळे सभागृह अधिक कार्यक्षम आणि आकर्षक बनविण्याचा उद्देश आहे.
या प्रस्तावित बदलांमुळे मनपाचे मुख्य सभागृह केवळ प्रशासकीय बैठकांचे केंद्र न राहता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित निर्णय प्रक्रियेचे प्रभावी व्यासपीठ बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. बैठका अधिक सुटसुटीत, वेगवान आणि परिणामकारक पद्धतीने पार पडतील, असेही पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
दरम्यान, या कामासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली असून, त्याला तातडीने प्रशासकीय व आर्थिक मान्यता देऊन पुढील कार्यवाही सुरू करण्याची मागणी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
