मावळ (पुणे):
मावळमधील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा अपघात झाला नसून, त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानेच त्याला दरीत ढकलून दिल्याचा प्रकार तपासातून उघड झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
वाढदिवसाच्या दिवशीच रचला मृत्यूचा खेळ
मिळालेल्या माहितीनुसार, गहुंजे (मावळ) येथे राहणारा २६ वर्षीय केतन विशाल अग्रवाल हा पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता आणि तो स्वतःही याच व्यवसायात कार्यरत होता. गुरुवारी केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते.
या दरम्यान, फोटोसाठी पोज देत असताना केतनचा पाय घसरला आणि तो ४०० फूट खोल दरीत कोसळला, ज्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेही पोलिसांना अशीच माहिती दिली होती.
पोलिसांच्या तपासात ‘तो’ बनाव ठरला खोटा
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता, हा अपघात नसून एक थंड डोक्याने रचलेला कट असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तांत्रिक आणि कौशल्याच्या आधारे तपास केला असता, फोटो काढण्याच्या बहाण्याने केतनच्या होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने त्याला थेट दरीत ढकलून दिल्याचे समोर आले. मुलीने पोलिसांना सांगितलेली अपघाताची कहाणी हा केवळ एक बनाव असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या खळबळजनक प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ पावले उचलत मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे, तर होणाऱ्या पत्नीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण कटामध्ये होणाऱ्या पत्नीचा थेट सहभाग किती होता? तसेच केतनची हत्या करण्यासाठी प्रियकराला आणखी कोणी मदत केली होती का? या दिशेने पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.
प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील मुलाची अशा प्रकारे फसवणूक करून हत्या करण्यात आल्यामुळे पुणे आणि मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केतनच्या पश्चात त्याचे आई-वडील, बहीण, दोन काका आणि दोन चुलत भाऊ असा परिवार असून, या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
