नंदुरबार:
नंदुरबार शहरातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय मुलींच्या वस्तीगृहात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहात राहणाऱ्या तब्बल २२ विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा कथित कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वस्तीगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, या वस्तीगृहातील दोन महिला कर्मचाऱ्यांमधील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. या संभाषणात विद्यार्थिनींच्या अन्न व पिण्याच्या पाण्याबाबत अत्यंत धक्कादायक चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही.
या घटनेची माहिती पसरताच वस्तीगृहातील विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि विद्यार्थिनींनी वस्तीगृहाबाहेर एकत्र येत तीव्र आंदोलन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही अपेक्षित कारवाई झाली नव्हती. आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधितांवर निलंबनाची आणि फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
या गंभीर प्रकरणामुळे समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी संबंधित या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
दुसरीकडे, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपची पडताळणी आणि आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच प्रकरणातील खरी वस्तूस्थिती स्पष्ट होणार आहे.
