साईमत -धरणगाव -प्रतिनिधी |
धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव मार्गावर सोमवार, २२ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात प्रचंड शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लग्नावरून परतताना काळाचा घाला
अपघातातील मृत किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव) हे पद्मालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून ते आपले वडील बाबूलाल राक्षे यांच्यासह दुचाकीने घरी परतत असताना हा अपघात झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोन्ही मित्र नातेवाइकांना भेटून जळगावच्या दिशेने जात होते. पाळधीनजीक दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली.
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले. या अपघातात वडील बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधी पोलीस करत आहेत.
