साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जळगाव पोलीस यंत्रणा अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या कडक आदेशानुसार, शहरात एकाच वेळी भव्य धडक मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.या मोहिमेत पोलिसांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर थेट प्रहार केला आहे.
उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर गुन्हा
वाईन शॉप, मोकळी मैदाने आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर (स्टॉल्स) उघड्यावर दारू पिणाऱ्यांची कसून तपासणी केली जात असून त्यांच्यावर थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत.
महामार्गावरील (हायवे) परवाना नसलेली हॉटेल्स आणि धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्यांवर आणि पाजणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
शाळा, कॉलेज आणि अल्पवयीन मुलांची सुरक्षा
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात सायंकाळच्या वेळी वेगाने वाहने चालवणाऱ्या स्टंटबाजांवर आणि टवाळखोरांवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.
मॉडिफाय केलेले मोठे सायलेन्सर लावून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
शाळा व कॉलेजच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर ‘कॉप्टा’ (COTPA) कायद्यांतर्गत थेट गुन्हे नोंदवले जात आहेत.
कॅफे आणि ‘ओयो’ हॉटेल्सची आकस्मिक तपासणी
शहरातील विविध कॅफे आणि ‘ओयो’ (OYO) हॉटेल्सची अचानक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली संशयास्पदरीत्या आढळल्यास कायदेशीर तपासणी करून कडक कारवाई केली जात आहे.
”नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असून, नियम मोडणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. ही धडक मोहीम अशीच पुढेही सुरू राहणार आहे.”
— श्रीकांत ढिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव)
