जळगाव:
इराण-अमेरिका वादाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘होर्मुज स्ट्रेट’ बंद झाल्यामुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे. याच दरम्यान, केंद्र सरकारने एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) कनेक्शनबाबत काही कडक नियम लागू केले आहेत. सध्या सोशल मीडियावर “३० जून २०२६ नंतर ज्या भागात पीएनजी पाईपलाईन आहे, तिथले एलपीजी सिलेंडर कनेक्शन थेट बंद केले जातील,” असा दावा वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या दाव्यामागचे नेमके वास्तव काय आहे आणि सरकारचे नवे नियम काय सांगतात, ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
३० जूनच्या डेडलाईनचे ‘हे’ आहे खरे सत्य!
सोशल मीडियावर केला जाणारा एलपीजी कनेक्शन कापण्याचा दावा पूर्णपणे खरा नाही. सरकारने ३० जूननंतर थेट गॅस कनेक्शन बंद करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत.
वास्तविक, मार्च २०२६ मध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाने ‘नॅशनल पाईप नॅचरल गॅस ड्राईव्ह २.०’ ही ९० दिवसांची विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेची मुदत ३० जून २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे ३० जूननंतर तुमचे कनेक्शन आपोआप बंद होणार नसले, तरी ज्या भागात पीएनजी (PNG) नेटवर्क उपलब्ध आहे, तिथे आगामी काळात एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर काही निर्बंध लादले जाऊ शकतात.
काय आहे ‘नो ड्युअल कनेक्शन पॉलिसी’?
सरकारने आता ‘एक कुटुंब, एकच गॅस कनेक्शन’ हा नियम सक्तीचा केला आहे.
३० दिवसांचा नियम: तुमच्या घरात आधीपासून एलपीजी सिलेंडर असेल आणि तुम्ही नवीन पीएनजी (पाईपलाईन) गॅस कनेक्शन सुरू केले असेल, तर तुम्हाला ३० दिवसांच्या आत तुमचे जुने एलपीजी सिलेंडर गॅस एजन्सीकडे जमा करावे लागेल.
९० दिवसांची नोटीस: ज्या भागात पाईपलाईन उपलब्ध आहे, तिथे स्थानिक गॅस कंपनी ग्राहकांना पीएनजी घेण्यासाठी नोटीस पाठवते. या नोटिसीनंतर ९० दिवसांच्या आत पीएनजीसाठी अर्ज न केल्यास, संबंधित ग्राहकाला एलपीजी सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
सुरक्षित आणि स्वस्त पर्याय म्हणून नागरिक आता एलपीजी सिलेंडर सोडून पीएनजी पाईपलाईनला पसंती देत आहेत. मार्च २०२६ च्या आकडेवारीनुसार, एकाच महिन्यात देशातील सुमारे १ लाख कुटुंबांनी आपले एलपीजी सिलेंडर सरेंडर केले असून, सध्या देशभरात १३.२४ लाखांहून अधिक पीएनजी कनेक्शन्स यशस्वीरित्या सुरू आहेत.
तुमच्याकडे दोन्ही कनेक्शन असल्यास काय करावे?
तुमच्याकडे इंडेन, भारत गॅस किंवा एचपी पैकी कोणतेही सिलेंडर असेल आणि घरात पीएनजी देखील सुरू झाला असेल, तर तात्काळ गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी सिलेंडर सरेंडर करा. सिलेंडर जमा केल्यानंतर तुमची सिक्युरिटी डिपॉझिट (सुरक्षा ठेव) थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तसेच, सिलेंडर सरेंडर करताना ‘टीव्ही’ (Transfer Voucher) आवर्जून घ्या, जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुम्हाला पुन्हा एलपीजी कनेक्शन सहज सुरू करता येईल.
३० जूनला कोणाचेही गॅस कनेक्शन अचानक कापले जाणार नाही. मात्र, ‘नो ड्युअल कनेक्शन पॉलिसी’नुसार एकाच घरात दोन वेगवेगळी कनेक्शन्स ठेवता येणार नाहीत.
