जळगाव/मुंबई:
शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार फुटीचे नाट्य रंगले असतानाच, आता आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पक्षाप्रमुखांनी हालचाली सुरू केल्या आहेत. नऊ पैकी सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. या खासदार फुटीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोळा ठाकरेंच्या उर्वरित आमदारांवर आणि नगरसेवकांवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला विधानसभेच्या २० पैकी १६ आमदारांनीच उपस्थिती लावली, तर चार आमदार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. बैठकीला विधान परिषदेचे पाच आमदारही उपस्थित होते. अनुपस्थित राहिलेल्या आमदारांनी मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे आपण येऊ शकलो नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बैठकीला हजेरी लावलेले आमदार
विधानसभा आमदार:
१. आदित्य ठाकरे, २. भास्कर जाधव, ३. सुनील प्रभू, ४. अजय चौधरी, ५. नितीन देशमुख, ६. सुनील राऊत, ७. बाळा नर, ८. प्रवीण स्वामी, ९. गजानन लवटे, १०. हारून खान, ११. कैलास पाटील, १२. वरुण सरदेसाई, १३. मनोज जमसुतकर, १४. बाबाजी काळे, १५. सिद्धार्थ खरात, १६. दिलीप सोपल.
विधान परिषद आमदार:
१. अंबादास दानवे, २. अनिल परब, ३. सचिन अहिर, ४. मिलिंद नार्वेकर, ५. ज. मो. अभ्यंकर.
अनुपस्थित आमदार आणि त्यांची कारणे:
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या ४ आमदारांनी पक्षाकडे आपली कारणे दिली आहेत:
संजय देरकर – गावी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
राहुल पाटील – विधान परिषद निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने अनुपस्थित.
सुनील शिंदे – वैयक्तिक कारणास्तव गावी आहेत.
संजय पोतनीस – अपरिहार्य कारणांमुळे बैठकीला येऊ शकले नाहीत.
सातवा खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर?
ठाकरांच्या शिवसेनेचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईत दाखल होताच या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते सगळे मिळून वाय. बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झाले.
दरम्यान, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ठाकरेंचा सातवा खासदारही आता फुटीच्या उंबरठ्यावर असून, तो कधीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतो, असे कदम यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण असून, पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
