जळगाव/नाशिक:
विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांच्या धक्कादायक विजयानंतर महायुतीमधील अंतर्गत वाद आणि खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत गीतेंनी बाजी मारली. या निकालावर आता जळगावमधील शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि माजी बंडखोर उमेदवार रेश्मा काळे (Reshma Kale) यांनी अत्यंत आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “गोकुळ गीते यांनी पाठीवर वार केला. आम्हाला पाठीवर वार करायला शिकवलेलं नाही, आम्ही छातीवर वार करणारे आहोत,” अशा शब्दांत त्यांनी गीतेंवर निशाणा साधला.
“आम्ही धर्म पाळला, नाशिकमध्ये मात्र दगाफटका!”
माध्यमांशी बोलताना रेश्मा काळे यांनी महायुतीमधील स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आम्ही पक्षाचे निष्ठावंत म्हणून महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला आणि पक्षादेश मानून माघार घेतली. मात्र नाशिकमध्ये हा महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, याचे मोठे दुःख आहे. जर आम्ही जळगावात आमची बंडखोरी कायम ठेवली असती, तर आमचा देखील आज विजय झाला असता.”
जळगाव आणि नाशिकमधील ‘ते’ कनेक्शन काय?
निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी (दबावामुळे) प्रचार थांबवण्याची घोषणा केल्यानंतर, जळगावमध्ये बंडखोरी केलेल्या रेश्मा काळे यांनीही महायुतीचे हित लक्षात घेऊन आपली उमेदवारी मागे घेतली होती.
जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात रेश्मा काळे यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला होता. त्यांची समजूत काढण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जंगजंग पछाडले होते. अखेर रेश्मा काळे यांनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर महायुतीचा धर्म पाळत आपला अर्ज मागे घेतला होता.
एका बाजूला निष्ठा, दुसऱ्या बाजूला बंडखोरी यशस्वी
जळगावमध्ये रेश्मा काळे यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे नंदकिशोर महाजन यांना शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची एकजूट मिळाली आणि त्यांचा मार्ग सुकर झाला. मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये पूर्णपणे उलटे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेत्यांनी वारंवार विनंती करूनही गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले होते. केवळ वरवर प्रचार थांबवल्याचे नाटक करून गीतेंच्या कार्यकर्त्यांनी पडद्यामागून गुप्त प्रचार केला आणि अखेर ३८९ मते मिळवत महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच अस्मान दाखवले.
गोकुळ गीतेंच्या या ‘गुप्त’ पॅटर्नमुळे नाशिकमध्ये महायुतीला मोठा फटका बसला असून, रेश्मा काळे यांच्या या विधानामुळे आता शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाशिक विरूद्ध जळगाव असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
