नाशिक:
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालात महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
‘विमानात बसलो, तरी माझे पाय जमिनीवरच राहतील’
नाशिक विधान परिषदेतील ऐतिहासिक विजयानंतर गोकुळ गीते यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी निवडणुकीतून माघार कधीच घेतली नव्हती. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर मी फक्त प्रचार थांबवला होता. परंतु, मी घरात बसलेलो असताना माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मित्रांनी गुप्त प्रचार केला,” असं गोकुळ गीतेंनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर माघार घेण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आला होता. मात्र लोकांची स्वतःची वैचारिक मते असतात. नरेंद्र दराडेंनी जनतेचा विश्वास गमावला, म्हणूनच आज गोकुळ गीते आमदार झाले आहेत. माझ्या या यशात मीडियाचाही मोठा सहभाग होता. निवडणूक कार्यकर्त्यांनीच पुढे नेऊन ठेवली होती, त्यामुळे हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.”
”एकनाथ शिंदेंनी तुम्हाला मुंबईला बोलावले असून त्यासाठी नाशिकमध्ये विशेष विमान पाठवले आहे,” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “मी विमानात बसलो, तरी माझे पाय नेहमी जमिनीवरच राहतील,” असं सूचक वक्तव्य गोकुळ गीतेंनी केलं.
”मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी माझा हा विजय त्यांना समर्पित करतो. महायुतीच्या नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी प्रचार थांबवला होता, परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले, त्यासाठी मी जाहीर माफी मागतो,” असेही गीते म्हणाले. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी आणि इस्लाम पार्टीने आपल्याला मोठी मदत केली, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. “एकनाथ शिंदेंना भेटण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, याचा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारूनच घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना तब्बल ३५७ मते
नाशिक विधान परिषदेसाठी एकूण ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीदरम्यान यातील १३ मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण ६०५ मते वैध ठरली. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या मतमोजणीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी तब्बल ३५७ मते मिळवत विजयाचा टप्पा पहिल्याच फेरीत सहज पार केला. तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मते मिळवता आली. दुसरीकडे, निवडणुकीच्या रिंगणात असलेले आणखी एक उमेदवार प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली.
नाशिक अंतिम निकाल:
एकूण मतदान: ६१८
अवैध मतदान: १३
वैध मतदान: ६०५
फायनल कोटा: ३०३
गोकुळ गीते (अपक्ष) : ३५७ (विजयी)
नरेंद्र दराडे (शिवसेना) : २४८
निकाल: गोकुळ गीते विजयी!
