मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, आता आणखी एका अत्यंत धक्कादायक बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे “शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार का?” आणि “एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली आहे का?” अशा चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटाला धक्का बसत असतानाच नवी चर्चा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का देत त्यांचे ६ खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत असतानाच, पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचा दावा केला जात आहे.
ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी ट्विटरवर (X) एक पोस्ट शेअर करत राजकारणातील या संभाव्य मोठ्या घडामोडीवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की:
”भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गंमत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते.
’फडणवीस फॅक्टर’ निस्तेज करण्याचा प्रयत्न?
असीम सरोदे यांच्या या ट्विटमुळे केवळ शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत समीकरणांवरच नाही, तर भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारण्यासाठी किंवा ‘फडणवीस फॅक्टर’ कमी करण्यासाठीच शिंदेंना ही ऑफर दिली गेल्याचा गंभीर दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. यामुळे महायुतीमध्ये आगामी काळात मोठे अंतर्गत वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
