साईमत -धरणगाव -प्रतिनिधी |
धरणगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील पष्टाणे बुद्रुक येथील एका ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सागर संतोष पाटील (वय ३२) असे मृत पावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
धरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या मालकीच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना अचानक पाय घसरल्याने किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले. विहिरीत पाणी जास्त असल्याने त्यांचा पाण्यात बुडून व गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना परिसरात उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सागर यांना तातडीने विहिरीबाहेर काढून उपचारासाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच ‘मृत’ घोषित केले.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची (AD) नोंद करण्यात आली आहे. सागर पाटील यांच्या अशा अचानक जाण्याने पष्टाणे बुद्रुक गावातील तरुण वर्ग आणि शेतकाऱ्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.
