अहमदाबादमधून चोरी झालेली कार जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांनी पकडली.
जळगाव -प्रतिनिधी -भारती सवर्णे |
गुजरात राज्यातील अहमदाबाद (ग्रामीण) येथून चोरीला गेलेली ९ लाख रुपये किमतीची ‘किया कॅरेन्स’ कार जळगाव शहरात जप्त करण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांचा इशारा धुडकावून पळणाऱ्या कारचा थरारक पाठलाग करून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले.
१५ मे २०२६ रोजी अहमदाबादमधील बोपल पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ‘किया’ कार (क्रमांक MP 04 ZL 5155) चोरीला गेली होती.
१८ जून रोजी संध्याकाळी ही कार नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगावकडे येत असल्याची गोपनीय माहिती गुजरात पोलिसांनी जळगाव पोलिसांना दिली.
माहिती मिळताच एम.आय.डी.सी. वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी काशिनाथ चौकात नाकाबंदी केली. पोलिसांना पाहताच चालकाने कार अजिंठा चौफुलीकडे वेगाने पळवली. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून अजिंठा चौफुलीवरील हिरो शोरूमसमोर कार अडवली.
जळगाव पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर १९ जून रोजी गुजरातच्या बोपल पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले असून, ९ लाखांची कार आणि संशयित आरोपीला नियमानुसार त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार संदीप सपकाळे, रमेश अहिरे आणि अफजल बागवान यांनी ही धाडसी कामगिरी केली.
