साईमत न्यूज नेटवर्क –
देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर 15 दिवस उलटूनही महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली नाही.
राज्यात पावसाची कमतरता गंभीर असून, मागील काही दिवसांत सामान्य सरासरीपेक्षा सुमारे 78 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत गुजरातमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. 4 ते 18 जूनदरम्यान देशभरात सुमारे 41 टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
पावसाच्या उशिरामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून अनेक भागांत पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. विदर्भात काही ठिकाणी 42.3 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे उन्हाचा कडाका कायम आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, इंटरट्रॉपिकल कन्जर्व्हेन्स झोन पुरेसा सक्रिय न झाल्याने मान्सूनचा वेग मंदावला आहे. तसेच प्रशांत महासागरात ‘अल निनो’ची स्थिती निर्माण झाल्यामुळे आगामी काळात दीर्घकाळ कोरडा काळ किंवा असमान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये ढगांची घनता कमी असल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 जून रोजी विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 जून रोजी महाराष्ट्र–कर्नाटक सीमावर्ती भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जेट स्ट्रीम पॅटर्न कमकुवत झाल्यानंतर मान्सून पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.
