साईमत न्यूज नेटवर्क –
जळगाव : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक बाजारात मोठे बदल दिसून येत असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे. यामुळे आज जळगाव सराफ बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली.
बाजारातील माहितीनुसार, सोन्याच्या दरात तब्बल 4,500 रुपयांची घट झाली आहे, तर चांदीच्या दरात 13,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. सध्या जळगावमध्ये सोन्याचा दर (GST सहित) 1 लाख 49 हजार रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 44 हजार रुपये इतका आहे.
दरातील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकन बँकांचे व्याजदर धोरण, डॉलरचे मजबुतीकरण, तसेच जागतिक तणाव कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे असलेली मागणी घटली आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडून प्रॉफिट बुकिंग वाढल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पुढील काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली असून, सध्याचा काळ गुंतवणूकदारांसाठी निर्णायक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
