जळगाव (प्रतिनिधी):
जळगाव शहरालगत असलेल्या सुप्रीम कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या डुब्बन नगरी परिसरात प्लास्टिकच्या कच्च्या मालाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत मोकळ्या मैदानात साठवून ठेवलेला शेकडो टन प्लास्टिकचा कच्चा माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेत धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
डुब्बन नगरी परिसरातील एका मोकळ्या मैदानात प्लास्टिकचे दाणे, खुर्च्या आणि चपला तयार करण्यासाठी लागणारा शेकडो टन कच्चा माल ढिगाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्यात आला होता. या ढिगाऱ्याजवळच असलेल्या इलेक्ट्रिक डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे या प्लास्टिकच्या मालाने पेट घेतला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्लास्टिक असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे लोट पसरले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा केला आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
ज्या परिसरात ही आग लागली, तिथे प्लास्टिक भंगार आणि कच्च्या मालाची अनेक गोदामे आहेत. आग जर आणखी पसरली असती तर परिसरातील इतर गोदामांनाही तिने कचाट्यात घेतले असते आणि कोट्यवधींचे नुकसान झाले असते. मात्र, अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग इतरत्र पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
