साईमत न्यूज नेटवर्क –
अफगाणिस्तानच्या वायू दलाने पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांतील कथित दहशतवादी ठिकाणांवर ड्रोन व हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईचे लक्ष्य ISIS-खोरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेचे अड्डे असल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणांचा वापर अफगाणिस्तानविरोधी कारवाया, कट रचणे आणि हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी केला जात होता. या अड्ड्यांवरून यापूर्वीही अनेक दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बलुचिस्तानातील किला अब्दुल्ला जिल्ह्यातील गुलिस्तान परिसर तसेच चगाई जिल्ह्यातील शकर अप आणि जंगल गार्डी भागातील ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. याशिवाय खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ओरकजई एजन्सीच्या कंबर खेल भागातील ISIS-खोरासानच्या अड्ड्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईत निश्चित करण्यात आलेली सर्व लक्ष्ये भेदण्यात यश आल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. मात्र, या हल्ल्यांबाबत पाकिस्तानकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद व सुरक्षा विषयक तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील काही भागांवर कारवाया करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने प्रत्युत्तरात्मक भूमिका घेण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. त्यामुळे या हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
