साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले असून एकूण 97.78 टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार, सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघातील एकूण 630 मतदारांपैकी 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 14 मतदार विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिले.
जिल्ह्यातील अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा या मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. तर भुसावळ केंद्रात 118 पैकी 116 मतदारांनी मतदान करत 98.31 टक्के मतदान झाले.
दुसरीकडे, चाळीसगाव मतदान केंद्रात सर्वात कमी 70.73 टक्के मतदान नोंदविण्यात आले. येथे 41 पैकी 29 मतदारांनी मतदान केले, तर 12 मतदार गैरहजर राहिले. काही नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने येथील मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
पुरुष आणि महिला मतदारांच्या सहभागाचाही उच्चांक पाहायला मिळाला. जिल्ह्यातील 315 पुरुष मतदारांपैकी 309 (98.10%), तर 315 महिला मतदारांपैकी 307 (97.46%) मतदारांनी मतदान केले.
एकूणच, जवळपास शंभर टक्के मतदान झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदान केंद्रनिहाय टक्केवारी
जळगाव विधान परिषद निवडणूक 2026
मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी
अमळनेर
100%
फैजपूर
100%
भुसावळ
98.31%
जळगाव
100%
एरंडोल
100%
पाचोरा
100%
चाळीसगाव
70.73%
एकूण मतदान : 616 / 630 (97.78%)
सर्वाधिक मतदान : अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल, पाचोरा (100%)
सर्वात कमी मतदान : चाळीसगाव (70.73%)
