पोलीस सिक्युरिटी बाजूला ठेवा, पहिल्यांदा गिरीश महाजनांनाच फोडणार; संजय राऊत यांचा दिल्लीतून थेट इशारा!
नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आक्रमक पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. “माझ्याकडे जर एक दिवस ईडी आणि सीबीआयचे अधिकार आले, तर मी पहिल्यांदा गिरीश महाजनांना फोडणार, आणि तेही अवघ्या अर्ध्या तासात!” असा थेट आणि मोठा इशारा राऊत यांनी दिल्लीतून दिला आहे.
राड्या’च्या विधानावरून महाजनांना चोख प्रत्युत्तर
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या ‘राड्या’च्या विधानाची थट्टा केली होती. त्याला राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले. महाजनांचा समाचार घेताना राऊत कडाडले, “मी आत्ताच गिरीश महाजनांचे वक्तव्य ऐकले. ते म्हणतात, ‘हे काय राडे करणार?’ मग मला सांगा, गद्दारांशी राडे करायचे नाहीत तर कोणाशी करायचे? याचा सरळ अर्थ असा की, महाराष्ट्रात गद्दारी पोसण्याचे काम स्वतः गिरीश महाजन करत आहेत.”
“पोलीस संरक्षण सोडा आणि रस्त्यावर या”
संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांना थेट आव्हान देत पोलीस यंत्रणेच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले:
“आमच्याकडे काय राहिले आहे, असे विचारणाऱ्या महाजनांनी एकदा पोलीस बाजूला ठेवून रस्त्यावर यावे. मग बघाच! पोलीस प्रोटेक्शनमध्ये कशाला फिरता? प्रत्येक गद्दाराला ४०-४० जणांची सुरक्षा का दिली आहे? सुरक्षा काढा, तुमच्या अंगावर चिंधीही राहणार नाही. ही आरएसएसची चड्डी, विचार-बिचार सगळं बाजूला राहील आणि पहिल्यांदा हेच पळताना दिसतील.”
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
महाजनांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना राऊत म्हणाले, “खाकी वर्दीची मस्ती आम्हाला दाखवू नका. स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि देवाच्या कार्यात भ्रष्टाचार करतात. यांनी कुंभमेळ्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. राडेबाजीचे आव्हान देऊ नका, धमक असेल तर पोलीस संरक्षण सोडून समोर या.”
६ बंडखोर खासदारांना ‘कारण दाखवा’ नोटीस
नवी दिल्लीत पार पडलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय विधिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अनुपस्थित खासदारांविषयी माहिती देताना राऊत म्हणाले की, आम्ही त्या बंडखोर खासदारांना ७ दिवसांचा वेळ दिला असून ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यांचे काय उत्तर येते ते पाहू, त्यानंतर त्यांना खासदारकीवरून अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करणार आहोत.
हॉटेल लीला मधून आमदारांना राजस्थानला हलवले; प्रत्येकी १० कोटींचा आरोप
पक्षातील फुटीच्या प्रश्नावर संतप्त होत राऊत म्हणाले, “तुम्ही ज्याला फूट म्हणता, त्याला आम्ही फूट नाही तर गद्दारी, बेईमानी आणि बदमाशी म्हणतो. हे सगळे लोक पैशाने विकत घेतले गेले आहेत. आज सकाळीच या खासदारांना दिल्लीतील ‘हॉटेल लीला’मधून हलवून राजस्थानमधील एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे. जर काही चुकीचे केले नाही, तर त्यांना असे का पळवून नेले जात आहे? ते लपून का राहत आहेत? दिल्ली सोडण्यापूर्वी त्यांना प्रत्येकी १० कोटी रुपये देण्यात आले आहेत,” असा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
