साईमत न्यूज नेटवर्क –
राजस्थान : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेने चांदीच्या दागिन्यांच्या मोहापोटी ७० वर्षीय विधवेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मृतदेहाचे शीर, हात आणि पाय वेगळे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे या ‘ब्लाइंड मर्डर’ प्रकरणाचा उलगडा झाला असून ५० वर्षीय रसाल देवी हिला अटक करण्यात आली आहे.
टोंक जिल्ह्यातील लवादर गावाजवळ काही दिवसांपूर्वी हात-पाय आणि शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख ७० वर्षीय हरबाई गुर्जर या विधवा महिलेची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक रोशन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मृत्यूंजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रसाल देवी मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. मुलांच्या विवाहासाठी घेतलेल्या कर्जामुळे तिच्यावर सुमारे २५ लाख रुपयांचे देणे झाले होते. सावकारांकडून सातत्याने पैशांसाठी तगादा लावला जात असल्याने ती मानसिक तणावाखाली होती. याच काळात तिची नजर हरबाई यांच्या हातातील आणि पायातील चांदीच्या कड्यांवर पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी रसाल देवीने हरबाई यांना चहासाठी आपल्या घरी बोलावले. गप्पांमध्ये गुंतवून ठेवत योग्य संधी साधून तिने कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करत हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे शीर, दोन्ही हात आणि दोन्ही पाय वेगळे करून त्यावरील चांदीचे दागिने काढून घेतले.
गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मृतदेहाचे अवयव आणि धड वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गावाबाहेरील कचरा डेपोत ते फेकून दिले, तर शीर दुसऱ्या ठिकाणी टाकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
हत्यानंतर रसाल देवी तब्बल तीन दिवस घराबाहेर पडली नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या काळात तिने गुन्ह्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे तपासाची साखळी मजबूत करत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलिसांनी आरोपीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड तसेच मृत महिलेचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. सध्या मेहंदवास पोलिस ठाण्यात रसाल देवीची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून केवळ काही चांदीच्या दागिन्यांसाठी एका वृद्ध महिलेचा इतक्या क्रूर पद्धतीने खून झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
