साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या एका युवकाला धमकावून त्याच्याकडून जबरदस्तीने स्वाक्षरी घेणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खोटे आरोप असलेले अर्ज तयार करून त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत महेश गोकुळ सोनवणे (वय २३, रा. सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक प्रकाश लोंढे, हर्षद सुनील पाटणकर, वकील यतीश देसले आणि अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी महेश सोनवणे यांना अंबड पोलिस ठाण्यातील एका मकोका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात असताना आरोपी हर्षद पाटणकर हा वारंवार त्यांना धमकावत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “तू माझ्याविरोधात जबाब का दिला, तुला जिवंत सोडणार नाही,” अशा शब्दांत धमक्या देत मानसिक दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी दीपक लोंढे व वकील यतीश देसले यांच्या सांगण्यावरून काही पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खोटे आरोप असलेला अर्ज तयार करण्यात आला होता. सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत आणि सुचित सोळुंके यांच्या विरोधात खोटी माहिती नमूद करून त्या अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी फिर्यादीवर दबाव आणण्यात आला.
स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अर्ज न्यायालयात सादर झाल्यास आणि पोलिस अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्यास सुरू असलेल्या मकोका प्रकरणात फायदा होईल, असे आमिष दाखविण्यात आल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कारागृहातून सुटकेच्या काही दिवस आधी आरोपींनी त्यांना एकटे गाठले. त्यावेळी दीपक लोंढेने त्यांचे पाय धरून ठेवले, तर हर्षद पाटणकरने गळा दाबत जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीपोटी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
यानंतर स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांचा वापर करून विविध शासकीय कार्यालये, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि न्यायालयाकडे अर्ज व तक्रारी पाठविण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करणे, न्यायालयाची दिशाभूल करणे आणि सुरू असलेल्या तपास प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जामिनावर सुटका झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित अर्ज फिर्यादीला दाखविल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अर्जातील मजकूर पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्याने त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित दीपक लोंढे व हर्षद पाटणकर हे अन्य गंभीर गुन्ह्यांप्रकरणी सध्या कारागृहातच असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात नाव आलेले वकील यतीश देसले यांचा पोलिस शोध घेत असून ते फरार असल्याचे सांगितले जात आहे.
