कोयंबतूर/अहमदाबाद : NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या मानसिक तणावामुळे देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत चार NEET विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
तामिळनाडूतील कोयंबतूर येथे NEET ची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय अनुकिर्ती या विद्यार्थिनीने बुधवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या काका आणि जवळच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. या संदेशात तिने आपल्या मनातील भीती आणि नैराश्य व्यक्त केले होते.
तिने लिहिले होते की, “मी NEET परीक्षा दिली होती आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची आशा होती. मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे आता पुन्हा परीक्षा द्यावी लागेल, या विचाराने मला खूप भीती वाटत आहे. माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी खूप पैसा खर्च केला आहे. आता मी त्यांना कसे सामोरे जाईन, हे मला समजत नाही.” या संदेशानंतर काही वेळातच तिने विष प्राशन करून जीवन संपवले.
दरम्यान, गुजरातमधील अहमदाबाद शहरातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू राणीप परिसरातील आनंदम फ्लॅट्सच्या बी-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने बुधवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हा विद्यार्थीही NEET परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या प्रकरणात आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी परीक्षेचा ताण आणि भविष्यासंदर्भातील अनिश्चितता यांचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांतील NEET विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे. यापूर्वी 16 जून रोजी देहरादून येथे 23 वर्षीय रिया थापा या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. तसेच लखनौमध्येही 17 वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवले होते.
NEET परीक्षेच्या संदर्भात निर्माण झालेली अनिश्चितता, वाढता स्पर्धेचा दबाव, पालकांच्या अपेक्षा आणि करिअरबाबतची चिंता यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विद्यार्थ्यांना वेळेवर समुपदेशन आणि मानसिक आधार मिळण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या सलग घडणाऱ्या घटनांमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक दबाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
